Sunday, May 4, 2014

आई बाबा तुम्ही जेवले का "

८ व्या मजल्याच्या बालकणीमध्ये ...
शांती शोधायच्या निम्मिताने ..
पेल्यात जीवनाचा अंधार ओतून ...
कशी बशी बिल्डींग्स ला लढा देत ..
माझ्या जवळ पोहचणाऱ्या हवेशी गप्पा मारत बसलो आज ...
घराच्या आता असलेला पंखा फक्त श्रीमंती फेकतो ...
खाली बघितले तर तेच ..साला नुसत्या मागण्या धावतांना दिसतात ..
औकाद वाढवण्यासाठी ,औकाद सोडून धावणाऱ्या मागण्या ...
१५ जन ही मावणार नाही एवढे मोठे अन सुसज्ज गार्डन..
वाट पाहत असतो ..कि कधीकधी ?मल्हार ला त्याचे आजी आजोबा नाही ..
त्याचे आई वडील घेऊन येतील त्याच्या जवळ......
चार चाकात गुदमरलेली हवा कधी कधी येते त्याच्या दाराजवळ ..
आणि काळ्या काचेच्या आत मल्हार अदृश होतो ..
मजुरी न मिळणारया आजी आजोबांच्या आसवांनीच ..
ते गार्डन कदाचित एवढे हिरवेगार राहत असेल ...
त्या गार्डन मधील खडा वा काटा असो 
कधी त्या आजी आजोबांना त्रास देत नाही ...
कदाचित मुलाचे आणि सुनेचे शब्द टोचून घायाळ झाल्यावरच ..
ते तिथे येऊन बसतात याची जाणीव ठेवत असतील ते ....
पेल्यातला अंधार संपत जात असतो ..
आणि काळीज काळेभोर होत जाते .....
पायांना चढलेल्या दारूने ..
कसा बसा पोहचतो,
  जिथे एक शरीर दुसऱ्या शरीराची वाट बघत असते ..
आणि हॉल मध्ये ..
" आई बाबा तुम्ही जेवले का "
हा तरी प्रश्न मुलाने विचारायला यावे ..
या आशेत जागणारया आई वडील ,यांची प्रेमळ मागणी ..
उभी असते बेडरूम च्या दाराजवळ ..
कदाचित सकाळ होई पर्यंत ....
बाकी काही नाही ...

नि:शब्द(देव)

बस बाकी काही नाही ...8

सकाळी उठलो की ,
रात्रभर अंगावर साचलेल्या ..तुझ्या आठवणी ,
पाण्याने धुऊन ...

पापण्यांच्या केसांना लटकलेले स्वप्न झटकून ...

काही ओठांपर्यंत शिताफीने पोहचलेल्या अश्रुनां,
तू दिलेल्या रुमालात लपवून ..
जगाला सुखी भासेल ..
निदान एवढे तर सुख डोळ्यात घेऊन ..
निघालो भिंतींच्या बाहेर ...

परत तुझ्या आठवणी गोळा करायला ...
बस बाकी काही नाही ...

नि:शब्द(देव)


बस बाकी काही नाही ..7

जाणाऱ्या दिवसाच्या धुळीने ..
तुझ्या आठवणी काहीश्या पुसटस्या होत जाताय...
येणारा प्रत्येक श्वास माणसा सारखा वागतोय ,
सतत जाणवून देतो कि तो उपकार करतोय माझ्यावर ...
कधी काळी लाल असतांना वहीत ठेवलेला गुलाब ,
काळा कुट्ट झालेला आहे ..आपल्या नात्यातल्या दुराव्या सारखा ..
किंवा आपल्या नात्या सारखाच ....
मोबाईल बदलला आहे आता ..
पण तुझा नंबर अजूनही त्याच नावाने वास्तव करून आहे ...
कित्येकदा तुझ्या नावापर्यंत येऊन तासंतास बोट घुटमळत बसतात ..
आठवत तुला "मी तुझ्यावर प्रेम करतो " हे सांगायला किती घाबरायचो आधी ...
तीच अगदी तीच भीती आता आहे ..वाटत तुला फोन करावा ..
विचारपूस तरी करावी ..पण ....
भीती जारी तीच असली तरी फरक आहेच की ..
पहिले भीती वाटायची तू नाही म्हणालीस तर काय होईल ?
आणि आता तर तू माझी नाहीस तरीही भीती वाटते ...
आपण बोललो आणि तुला माझी आठवण झाली तर ?
नको ..जाऊ दे सोड ...
आपले नाते जसे आपण मनात कुठल्या तरी कप्प्यात लपवून ठेवले आहे ..
अगदी तसेच आपला एक फोटो अजूनही कपाटात लपवून ठेवला आहे ...
माझ्याच पासून लपवून ठेवला आहे म्हण हवे तर ...
अजूनही तुझच नाव निघत कधी पीत बसलो तर ..
तेच मित्र आहेत अजून माझे ...जे मला मदत करायचे ..आपले नाते जुळवण्या साठी ..
आणि आज ही तेच मदत करतात ...
तस पहिले तर सर्व तसच आहे गं...
बस एक बदललय..
आणि तो बदल नकोसा जरी असला तरी ,
जागाव तर लागेलच गं..
नको असलेले जीवन घेऊन जसे जगतोय ..तसेच अगदी तसेच ...
तोवर भावनांच्या घड्या करून ठेवल्या आहे मनात ..
एक एक घडी उघडत जाईल ..आणि
एक झालेला बदल .....अनेक बदल करायला भाग पाडेल ...कदाचित
बस बाकी काही नाही ...

नि:शब्द(देव)

"आता माझी वेळ आहे....."

शेजारच्या काकू कडे गेलेलो,
चन्द्रकान्ता नाटक बघायला.....
मला घराबाहेर ढकलत,काकु म्हणाल्या...
तुझी आई बोलावतेय तुला जा..
आणि दार लावुन घेतले...

मी घरी आलो तुला विचारले..
आणि सर्व सांगितले ..

तु भरल्या डोळ्यांनी ...
मला जवळ घेतले होतेस..
मला वाटले होते..
आप्ल्या कडे TV नाही म्हणून ...
पण ..
मला हवे ते देवु शकत नाहिस...
म्हणून, तु रडली होतीस ना आई?

एकदा तु मला तुझ्या सोबत..

XX
काकूंकडे घेऊन गेली होतीस ,
तु भांडी घासत होतीस ..
मी पिंट्या सोबत खेळत होतो..
काकूंनी त्याला बोलावुन ice cream दिली ..
मी ही मागितली,तर त्यांनी ,
मला रागावुन घराबाहेर काढले..
मी रडत रडत तुझ्या कडे आलो..

तु मला मिठीत घेतल होतस..
तुझ ही मन भरुन आलं होत .

मला वाटले होते,
तू मला ice creamे देवु शकत नाही म्हणून
म्हणून..

पण ..
माझ्या डोळ्यात आसवे आली ...
म्हणून तू रडली होतीस ना आई?

कॉलेज ला गेलो.
second hand
कपडे घ्यायचो.
तू मला ते शिवुन द्यायचिस
college
मधली मुले हसायची माझ्यावर,
पण मला खराब नाही वाटायचे..
मी अजुन जिद्दिने मेहनत करायचो..

कारण मला तुझ्यासाठी TV आणायचा होता,
मला आपल्या घरी भांडी घासायला बाई ठेवायची होती ...
मी कॉलेज वरुन आल्यावर..
मला उदास पाहून ..

तुला सर्व जाणवायच ,
तेंव्हा बोलताना तुझा कन्ठ दाटुन आला होता..
मला वाटले होते मला उदास पाहुन..
पण ...

तू मला, बाकी मुलांना ज्या मिळतात ..
त्या सुख सोयी देदेऊ शकत नाहीस म्हणून ..

म्हणून तु रडली होतीस ना आई?



कधी तुला सांगितले तर नाही ,
पण मला जे हवं होत ..
ते तू मला दिले आहेस..

"
आता माझी वेळ आहे....."



-
निशब्द(देव)

जगतांना नेहमी तू,

जगतांना नेहमी तू,
ठेव मनाशी ध्यास |
कष्टाचा असावा तो,
तुझा प्रत्केक श्वास ||

मनास चिंता नसावी,
रक्तास ठेव गार |
आलेल्या अडचणी कर,
हसत खेळत पार ||

हाती येईल त्या त्या
कामाला दे वाव,
जिथे पाय नेयील,तू
त्या वळणावर धाव|

कष्टाला लाज यावी,
कर तू इतुके कष्ट|
सुख लोळेल पायी मग
दु:ख होतील नष्ट||

नि:शब्द(देव)

बस बाकी काही नाही 6

कुठेतरी बेवारशी पडलेल्या ..
त्या पावूलाखुनांवर आठवणी पेरून ..
एक मोठ झाड उगवाव ..
प्रत्येक फांदीवर आठवणी ..
काही हिरवीगार आणि काही ..
सुकलेली .....बेजान ...
त्या हिरव्या आठवणीत ..
उठून दिसेल ते सुकलेलेच...
भर उन्हात घामाघूम कुणी ..
सावली साठी आसरा घेताना ..
बोलेल हि कदाचित अरे इतक्या सुंदर झाडावर ..
काही सुकलेले पान !चांगले नाही वाटत ..
दु:ख मुळात नकोसेच झाले आहे सर्वांना ...
ते गळेल कधीतरी ..हिरवागार होईल हि झाड ..
पण पानझड तर येणारच ...
फक्त फांद्या उरतील, पान नसलेली ..ओसाड ..
सर्व बघून सहानुभूती देतील ...शिव्याच म्हणा ..
पन मोहोर फुटेलच परत ..
बस तोपर्यंत लढायचं ..
बस बाकी काही नाही
निशब्द(देव)

श्रवन बाळाची गोष्ट

(अहो हळू बोला त्यांना आवाज जाईल ...)
तू थांब ग ..

" हे बघ ताई ..
त्यांनी जे केले ते त्यांचे कर्तव्य होते "
सर्व जन करतातच ..यांनी काही वेगळे नाही केले आपल्यासाठी ...
आणि हो ...
शाळेत जायचो तेंव्हा ..
फाटकी गरिबी घालून जायचो ...मुल चिडवायचे ..
कोलेज ला जातांना ही याच्या त्याच्या सायकल वर दररोज बसून जायचो भिकाऱ्या सारखे ..
साऱ्या हौस आशा अपेक्षा यांचा खून तेंव्हाच झाला ..
जेंव्हा माझा या घरात जन्म झाला ...
आणि ...
जाऊ दे ..तुला काय ..सांभाळायचे मला आहे ना ..
मला माहिताय माझा त्रास ..
तू उट सूट सल्ले द्यायला मोकळी ...
देतोय ना दोन वेळेचे गिळायला ...
अंग झाकायला कपडे ...
अजून काय करू ..श्रवण बाळ बनू का ?

असे म्हणून फोन ठेवला त्याने ...
अख्खा आयुष्यात ताठ मानेने जगणारा मी ..
मुलाच्या या शब्दाने अख्खे आयुष्य चिरून टाकले होते ...
बायको देव घरात बसली ...
आसवात देव ठेवला होता तिने ?

माझ्या नातुला घेऊन मी तिच्या जवळ गेलो ...
थोड्या वेळ बघत राहिले ...
डोळे पुसले ...
नातुला जवळ घेत म्हणाली ...

बाळा ये तुला श्रवन बाळाची गोष्ट सांगते .......

नि:शब्द(देव)